Wednesday, August 11, 2010

शोभा झाली ती पुरे...

देशाचा 64वा स्वातंत्र्यदिन चारच दिवसांवर येऊन ठेपले आहे...आणि आमच्यावर साहेबी छत्र असलेल्या राष्ट्रकुल नामक स्पर्धेच्या रूपाने एक नवे बालंट येऊ घातले आहे..."आम्ही खरोखरच इतके नालायक नाही', की राष्ट्रकुल सारखा इव्हेंट घेऊ शकत नाही...परंतू इंडियन ऑलिंम्पिकमधील काही मंडळींमुळे देशाची इभ्रत वेशीला टांगली गेली आहे...
ब्रिटिशांनी ज्या देशांवर अधिराज्य गाजविले त्या देशांचा समुह म्हणजेच राष्ट्रकुल. मुळात ऑलिम्पिक, जागतिक स्पर्धांच्या जोडीला प्रत्येक खंडाच्या स्वतंत्र स्पर्धा (जसे एशियाड) होत असताना राष्ट्रकुल सारख्या मेगा इव्हेंटची आवश्‍यकता काय? असेही ऑलिम्पिक, जागतिक स्पर्धांसाठी राष्ट्रकुलला नेहमीच बुट्टी मारणाऱ्या बड्या स्टार खेळाडूंची संख्या मोठी असते. आपल्या देशाला या स्पर्धेमुळे जर काही फायदा होणार होता, तर तो म्हणजे...

1. खेळांच्या पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या असत्या...
2. ज्या शहरात स्पर्धा त्याठिकाणी साधारणपणे वर्षभर उत्सवाचे वातावरण...
3. एशियाड सारख्या बड्या स्पर्धेच्या आयोजनाच्या दृष्टीने "आम्ही सक्षम आहोत' हे दाखविण्याची एक पायरी...

...पण ती पायरी सुद्धा आम्हाला आत्तापर्यंत नीटपणे पार करता आली नाही...प्रत्यक्षात स्पर्धा पार पडत असताना त्यात किती प्रमाणात सुधारणा होते...हे पाहण्या लायक ठरेल...चीनने बीजिंग ऑलिम्पिकचे ज्या पद्धतीने आयोजन करून संयोजनात एक नवा मापदंड घालून दिला...तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न युरोप व अमेरिका आदी राष्ट्र करत असताना भारताने आपल्या तांत्रिक सज्जतेची चुणूक दाखवून द्यायला हवी होती...चीनचे ऍक्रोबॅटिकल कौशल्या...स्वप्नवत वाटाव्या अशा कल्पना साकार करून सादर केलेला उद्‌घाटन समारंभ (जसे मैदानाच्या छताला उच्च क्षमतेचे दोर लाऊन त्यावरील कवायती...पृथ्वीच्या आकाराच्या महाकाय वर्तुळावरील कवायती...बॉक्‍स ग्रुप डिस्प्ले वगैरे...) आमच्या मंडळींनी मात्र राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजनातील 30,000 कोटी रूपयांवर डल्ला मारण्यावर धन्यता मानली असे चित्र सद्या निर्माण झाले आहे...
...सद्या या भ्रष्टाचाराबद्दल कमालीचा धुराळा उडाला असताना कॉंग्रेसजन तर त्यास भ्रष्टाचार मानायला तयार नाही...ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर, दिग्विजय वगैरेचे या स्पर्धेवर टिका करणारे कटु बोल मला सुरूवातीला विस्मयकारक वाटत होते...परंतू त्यात आता सत्यता वाटू लागली आहे...माननीय सुरेश कलमाडी हात झटकून आपला कोणत्याही भ्रष्टाचारात सहभाग नाही...असे सांगत असले...आणि त्यावर एक वेळ विश्‍वास ठेवायचे म्हटले तरी...राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजनातील सर्वोच्च व्यक्तिमत्व म्हणून भ्रष्टाचार होणार नाही याची काळजी घ्यायल नको होती का?
जर भ्रष्टाचारच झाला नसेल तर नुसत्या आरोपांनी ते किंवा त्यांची समिती व्यथित व्हायला काय अशिक्षित खेडूत वाटली का? मि. कलमाडी आणि श्रीयुत "आयओसी', देशाची शोभा झाली ती पुरे...आता तरी जागे व्हा...मैदाने एक वेळ वेळेवर पूर्ण झाली नाही तरी चालेल...परंतू स्पर्धेच्या वेळी कुणालाही बोलायला जागा ठेऊ नको...शेवटी आज तुमच्या समोर पैसा हा खरोखरच प्रश्‍न नाही...तो तर तुम्हाला मन मानेल तसे मिळाल आहे...आता तो इमानदारीने खर्च करा...आणि जबाबदार, तत्पर लोकांकडे कामांची वाटणी करा...काम न करणाऱ्यांना तात्काळ खड्यासारखे बाजुला करा...नाही तर भारताने एशियाड सारख्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन विसरून जावे...ऑलिम्पिक तर अजुन आपल्या पासून वीस एक वर्ष तरी लांब वाटत आहे...

जय हिंद!

No comments: