आकाशी तवंग : पाणी हिरवे निळे, केरकचरा व बांधकाम साहित्य फेकण्याचा अड्डा!
वाचे म्हणता हर हर गंगा,
सकळ दोष जाती भंगा।।
दृष्टी पडता ब्रम्हगिरी,
त्यासी कैसी यमपूरी ।।
कुशावर्ती करिती स्नान,
त्याचे कैलासी राहणे...अशी महत्ती नाथांनी कथन केलेल्या मुळ गंगा...गौतमी...अर्थात गोदावरी नदीच्या प्रदुषणाचा विषय काही नविन बाब नाही...परंतू आपल्या उगमस्थानी मलिन झालेल्या गोदे बरोबरच आता गावातल्या तलावांच्या प्रदुषणाचे प्रमाण सहजपणे दृष्टीस पडत आहे.
दक्षिण भारताची जिवनरेखा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी केवळ धार्मिक, आध्यात्मिक स्तरावरच नव्हे, तर आठशे मैलाचा विस्तीर्ण प्रदेश आपल्या पाण्याने सुपिक करून भोवताली असंख्य शहरे, गावे व खेड्या-पाड्यांचे पालन व पोषण करणाऱ्या गोदावरीला दक्षिण भारतात अनन्यसाधारण असे महत्व आहे.
नदी काठच्या गावांमुळे व कारखान्यांमुळे जगभर असंख्य नद्यांचे आरोग्य धोकादायक पातळीवर जाऊन पोहोचले आहे...परंतू हिंदू धर्मियांमध्ये सर्वोच्च आदर असणाऱ्या आणि जिच्या जळाची तुलना अमृताशी केली जाते त्या गोदावरीच्या वाटेला तिच्या जन्मस्थानी ही अवहेलना!
गौतमी तलावाला विळखा
त्र्यंबकेश्वर मंदीराच्या पाठीमागे व संगमाला खेटून असलेला पाच एकर क्षेत्रात पसरलेल्या विस्तीर्ण गौतमी तलाव भरभरून वाहत असल्याचे चित्र प्रसन्न करणारे होते...कॅमेऱ्याची कॅप उतरवून तलावाची छबी चित्रबद्ध करत असताना पश्चिमेकडे ओव्हरफ्लोच्या ठिकाणी घाणीचा मोठा तवंग दिसून आला...हल्ली बऱ्याच नद्या, नाल्यात असे तवंग दिसतच असताता...परंतू या तवंगामध्ये आकाशी रंगाच्या घट्ट द्रवपदार्थाची मोठी मात्रा आढळली...जणू काही आकाशी रंगाचे ऑईलपेंटचे ड्रमच्या ड्रम कोणीतरी मोठ्या प्रमाणावर कोणी तरी पाण्यात मिसळले असावे. फक्त सांडपाण्यामुळे उठणाऱ्या तवंगापेक्षा हा प्रकार भिन्न व कमालीचा चिंतेचा वाटला.
असा दिवस जात नाही की त्र्यंबकेश्वरी भाविकांची गर्दी नाही...यात बहुतांशी भाविक त्रिपींडी, सपिंडी, नारायण नागबली-श्राद्धाती कार्यासाठी येतात...ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतात...याशिवाय धार्मिक महत्व असलेली असंख्य ठिकाणे गावात चहुबाजूंना विखुरली आहेत...ज्यात निवृत्तीनाथ महाराजांची संजिवन समाधी सुद्धा आहे...इथल्या प्रत्येक पुजाविधीचा संबंध पाण्यात अंघोळ व तिर्थादीसाठी येतोच. या नगरातील एक मोठा तलाव इतका प्रदुषित असेल तर ती कमालीची क्लेषदायक बाब आहे. मंदिराचे माध्यान्ह पुजारी स्वर्गीय डॉक्टर नानासाहेब शुक्ल यांनी त्र्यंबकेश्वरच्या पर्यावरणासंबंधी विपुल प्रमाणावर चळवळ उभी करून सकस असे लिखाण केले आहे. दैनिक सकाळमध्ये त्यांचे या विषयावरील अनेक लेख यापूर्वी प्रसिद्ध झाले आहेत.
गौतमी तलावाचे पाणी हिरवे निळे झाले आहे. यातील निळा रंग हा ऑईल पेंटशी साधम्य साधणारा आहे. या शिवाय इतर प्रदुषणाकारी घटक सहज दृष्टीस पडतात. दृष्टीआडच्या प्रदुषणाचे काय? |
नानासाहेबांच्या पश्चात या नगरीच्या प्रदुषणाचा व पर्यावरणाची ध्वजा कोणी तरी खांद्यावर पेलायला हवी. ही ताकद अर्थातच नव्या पिढीमध्ये आहे. इथल्या युवकांमध्ये जर नगराविषयी व इथल्या महान सांस्कृतिक, धार्मिक व ऐतिहासीक वारशाविषयी ममत्व निर्माण करता आले तर या प्रश्नावर नक्कीस चळवळ उभारली जाऊ शकते. अर्थात या नगराच्या प्रदुषणाचा प्रश्न हा फक्त मोठ्या संख्येने येणाऱ्या यात्रस्तांशी जोडता येणार नाही. गावच्या मंडळींनी एकत्रितपणे केरकचरा, सांडपाणी व एकुणच स्वच्छतेच्या बाबतीत महत्वपूर्ण निर्णय घेऊन जाणिवपूर्वक या दिशेने प्रयत्न करण्याची गरज आहे. एक वेळ पर्यटकांनी रस्त्यावर व शेताच्या कडेला फेकलेले कागद व बाटल्या उचलता येऊ शकतात, परंतू पाण्यात होणाऱ्या प्रदुषणाचे काय? त्यासाठीच नगरपालिकेने या विषयावर प्राधान्याने योजना तयार करायला हवी व त्यात गावच्या मंडळीचा सक्रीय सहभाग घ्यावा. काही तलावांवर संरक्षक जाळ्या बसविल्याने त्यात केरकचरा फेकण्याचे प्रमाण कमी झाले आहे. परंतू गौतमी सारख्या तलावांना अशी जाळी टाकणे दुरापास्त आहे. तलावात सर्रासपणे केरकचरा, बांधकाम केल्यावर निघणारा मलबा टाकले जातो. दगडी काठ असलेल्या तलावावर ठिकठीकाणी शिळ्या भाज्या फेकलेल्या दिसतात.
नित्य पुजाकर्म व आलप्या व्यवसायात मग्न असणाऱ्या मंडळींनी नुसते मनात आणुन प्रदुषणाचा वेगळा विचार सुरू केला तरी नदीच्या, तलावांच्या व पर्यायाने गावच्या स्वच्छतेचा सुंदर चित्र निर्माण होऊ शकेल.
---