Wednesday, January 27, 2010

इतिहासाची पुनरावृत्ती;

उत्साह वाढवताहेत बक्षिसे...अन्‌ शुभेच्छा!




ध्यानी मनी नसताना एखादी घटना घडते..."तुम्हाला राजीमाना द्यावा लागेल'...असे शब्द कानी पडतात...चुक नसताना आलेले हे बालंट नोकरी जाण्याच्या भावनेपेक्षाही जास्त बिकट...असा प्रसंग मी 2009 साली अनुभवला होता...आज त्यात घटनेचा पुढचा अंक...या वेळचा प्रसंगी मात्र सर्वस्वी निराळा...ज्या घटनेमुळे माझी नोकरी जाण्याची पाळी आली होती, त्याच प्रसंगात यंदा मी बक्षिसाचा मानकरी ठरलो.

बिग गन्स नेव्हिगेशन कार रॅलीत मला अनपेक्षीतपणे तिसऱ्या क्रमांकाचे बक्षिस मिळाले. त्याचे सविस्तर वृत्त रविवार दिनांक 10 जानेवारी, सकाळच्या नाशिक आवृत्तीमध्ये छापुन आले होते.
सोमवारी माझे जुने फोटोग्राफर मित्र सचिन निरंतर यांचा अभिनंदनाचा फोन - तुला तिसरा व पाचवा क्रमांक मिळाला आहे. मला वाटले कार रॅलीत तिसरे बक्षिस मिळाल्याच्या बातमीबद्दल तो अभिनंदन करतोय! मी म्हटले, मित्रा मला तिसरा क्रमांक मिळाला आहे. एका वेळेस एकच बक्षिस मिळते. तो म्हणाला नाही दोन बक्षिसे आहेत व मला (म्हणजे त्याला) द्वितीय, तर दैनिक सामनाचे भूषण पाटील यांना प्रथम बक्षिस मिळाले आहे. लगेच ट्युब पेटली - हा तर स्पोर्टस्‌क्राफ्टच्या फोटोग्राफी स्पर्धेचा निकाल.
मागच्या वर्षी या इव्हेटच्या प्रॅक्‍टीसराऊन्डची बातमी आमच्या दैनिकात मिस झाली होती (त्यात माझा कोणताही रोल नाही). या घटनेवरून काही गैरसमज झाले आणि संपादकांनी व्यवस्थापकांना बोलावून मला काढून टाकण्याचे आदेश दिले. माझ्या चेहऱ्यावर कमालीचा निर्विकारपणा होता - हे काय चालले आहे? पश्‍चाताप नव्हताच. मी चुक केली नाही, तर पश्‍चाताप का करू, आणि तो माझ्या चेहऱ्यावरून प्रतिबिंबीत तरी कसा होणार? अशी ती अवस्था होती. संपादकांना वाटले मला झाल्या प्रसंगाबद्दल काहीही वाईट वाटले नाही, तर मला वाटत होते, की ज्या सहकाऱ्यावर बातमीची जबाबदारी दिली, त्याने अक्षम्य दुर्लक्ष केले.

सरतेशेवटी माझ्याबद्दलचा तो निर्णय मागे फिरला हा भाग अलाहीदा, परतू म्हणतात ना - हिस्ट्री रिपीट्‌स इटसेल्फ; आज त्याच स्पोर्टस्‌क्राफ्टच्या स्पर्धेने मला दोन बक्षिसे मिळवून दिली आहेत. माझी "एक पुरस्कार विजेता छायाचित्रकार' अशी नविन ओळख या घटनेने करून दिली आहे.

तसे बघितले तर जानेवारी 2010 या वर्षाची सुरूवातच धुमधडाक्‍यात झाली आहे - कोणताही संकल्प सोडलेला नसताना एकापाठोपाठ एक सुखद धक्कादेणाऱ्या गोष्टी घडल्या आहेत. पहिला धक्का म्हणजे मी एक कॅमेरा विकत घेतला. अनेक छंद करून झालेत, परंतू स्टिल फोटोग्राफी ही केवळ दुसऱ्यांच्या कॅमेऱ्यातूनच करण्याचे योग येत होते. त्यातही प्रोफेशनल कॅमरा हाताळण्याची फारशी संधी मिळाली नाही. डिजीटल क्रांतीतील ऍमॅच्युअर कॅमेरे व ऑटोमोडच्या बळावर काही प्रेक्षणीय छायाचित्रे जरूर टिपलीत, पण त्याचे श्रेय हे सह्यगिरीतील भ्रमंतीलाच अधिक. कारण अशी अफलतून दृष्य एरवी बघायला मिळत नाहीत.

काही जुन्या फोटोग्राफर मित्रांसोबत परंतू वेस्टर्न इंडिया स्पोर्टस्‌ असोसिएशनच्या राष्ट्रीय कार रॅली अजिंक्‍यपदाचे वार्तांकन करताना सतत टाकतो, तसा खडा टाकुन दिला, "तुमच्या पैकी जर कोणाला तुमचा कॅमेरा विकायचा असेल तर मला कळवा, मी त्यावर विचार करीन'. या प्रश्‍नावर नेहमी प्रमाणे आम्ही आमचा कॅमेरा आत्ताच दिला, अगोदर सांगायला हवे होते' हे उत्तर मिळाले.
खरे तर अगोदर सांगणार कसे, जो भेटेल त्याला सांगत होतो. आता स्वत:चा कॅमेरा हवा असे मनोमन वाटत होते. मनातील घुसमट व्यक्त करण्याचे ते एक सुंदर व्यासपिठ असल्याचे मी नम्रताला सांगत होतो. माझे शुन्यात हरविणारे डोळे बघुन तिनेही होकार दिला होता. परंतू पाच ते दहा हजारापेक्षा जास्त बजेट अफोर्ड करू शकणार नाही, हे स्पष्ट होते. मित्रवर्य सचिन पाचोरकरांनी एक लेटेस्ट सेमी प्रो कॅमेरा बघिला, परतू त्याची किंमत 22000 होती, त्यामुळे ते सुद्धा एक दुरचेच स्वप्न वाटत होते. जी काही कमाई होते, ती सर्व दैनंदिन खर्च व त्यातून जे काही शिल्लक राहील, त्यातून हॅन्डीक्राफ्टचा उद्योग उभा करणे याकरिता खर्ची होत होती.
अखेर प्रविण पगारेंनी कॅननचा "मार्क 5 डी' घेतला व आपला कॅमेरा विकण्याचा निर्णय घेतला. त्यांचा प्रोफेशनल "400 डी - डिजीटल रिबल एक्‍सटीआय' अशा पद्धतीने माझ्याकडे आला. हा एक मोठ्ठाच धक्का. मित्र अभिलाष बोटेकरने पाच हजाराची तातडीची मदत केली. पुस्तकाचे एक काम आल्याने वरचे साडे आठ हजार महिन्याभरात फेडणे शक्‍य होणार होते.
डिसेंबर महिन्यात स्पोर्टस्‌क्राफ्टची रॅली होती. कार्यालयात फोन करून इव्हेंट कव्हर करण्यास सांगितले. मागिल वर्षाचा अनूभव सर्वांना ठाऊक होताच, परंतू बातमी व छायाचित्रासाठी माणूस नसल्याने मला तातडीने पाचारण करण्यात आले. अशा पद्धतीने आदल्या वर्षी माझ्या मुळावर उठलेला इव्हेंट कव्हर करण्याची जबाबदारी माझ्या शिरावर येऊन पडली. कॅमेरा येऊन आठवडाही झाला नव्हता, तरी पण मला फोटोग्राफीचा गंध नसल्याने मी सचिन निरंतर यांना दरोज फोटो देत जा! अशी विंनंती केली.
मी 1996-97 पासून नाशिक परिसरात वेगवेगळे मोटर स्पोर्टस्‌ इव्हेंट पत्रकार म्हणून कव्हर केले आहेत, त्यातही काही राष्ट्रीेय इव्हेंटचा पीआरओ होतो. भारतातील नामांकीत छायाचित्रकारांचे काम याची देही याची डोळा बघितले आहे. तो अनुभव आणि माझ्या कॅमेऱ्याच्या बेसिक लेन्सच्या मर्यादेत राहून यथेच्छ फोटोग्राफी केली. या स्पर्धेच्या वेळी विविध कॅटॅगरीत अडीच हजारापर्यंतची बक्षिसे ठेवण्यात आली होती व नाशिकचे जवळ पास सर्व अनुभवी प्रेस फोटोग्राफर्स हजर होते.


बिग गन्स...शॉट गन
नाशिकमध्ये वेस्टर्न इंडिया स्पोर्टस्‌ असोसिएशनने आपल्या दशकपूर्ती वर्षारंभानिमीत्त नेव्हिगेशन कार रॅलीचे आयोजन केले होते. रॅली फक्त विसाच्या सदस्यांसाठीच होती, त्यामुळे जवळपास सर्वच स्पर्धक मातब्बर. "तुम्ही इतकी वर्षे विसा सोबत आहात, तर तुम्ही सुद्धा भाग घ्या', असे विसाचे अध्यक्ष अश्‍विन पंडित यांनी सांगितले. मला व दीपक ओढेकर यांना त्यामुळे संधी मिळाली. आम्ही दोघे सोडून, बाकी सर्वच मोटरस्पोर्टस्‌च्या खेळातील निष्णात. भलीमोठ्ठी प्रवेश फी आणि कोणताही पूर्वानूभव नाही, त्यामुळे स्पर्धेत नेव्हिगेटरची अवघड भूमीका पार पाडायची की नाही, या विषयी मनामध्ये साशंकता होती. ओढेकरांना कार्यबाहुल्यामुळे जमले नाही, मी सहभाग घेतला.
स्पर्धेचा एक नियम होता, ड्रायव्हर व नेव्हिगेटरच्या जोड्या या चिठ्ठी पद्धतीने ठरणार आणि रोड बुक स्पर्धा सुरू झाल्यानंतरच हातात मिळणार. आदल्या दिवशी ड्रायव्हर्स ब्रिफींगच्या वेळी अश्‍विन पंडितांनी कुशलतेने काही मुलभुत टिप्स दिल्या.

मातब्बर स्पर्धकांच्या उपस्थितीत शनिवारी विसाची "बिग गन्स कार रॅली' पार पडली. पहिल्यांदाच पोहण्याचा सराव करण्यासाठी पाण्यात उतरावे, तसा पहिल्या शंभर मीटर्सचा अनूभव होता. गाडीचे ओडोमीटर शुन्यावर सेट न करताच आम्ही स्टार्ट घेतला, इथेच पंडितांनी दिलेल्या मुलभूत सुचनांपैकी पहिल्या सुचनेकडे दुर्लक्ष झाले. त्यानंतरचा प्रत्येक सेकंद माझ्याकरिता पाण्यात गटांगळ्याखाण्यासारखा होता. माझा ड्रायव्हर संजय खत्री हा निष्णात असल्याने अगदी बेफिकीर नसला तरी निश्‍चींत वाटत होता. प्रश्‍न होता, तो दोघांचे ट्युनिंग जमण्याचा. ते जेपर्यंत पहिली वेळनियंत्रक चौकी (टीसी पॉईंट) जवळ जवळ चुकली होती.

मी रस्त्याचे दिशादर्शन बिनचुक ठेवण्याचा प्रयत्न करत होतो, तर पप्पु खत्री फक्त किलो मीटर्स मॅच होताहेत की नाही, यावर व पुढचे ट्युलीप जुळतेय की नाही यावर लक्ष ठेवत होता. वेळ आणि वेगाचे गणित करायला फुरसतच नव्हती. रस्ता चुकतोय असे लक्षात आल्यानंतर दोनदा मागे फिरून झिरो सेट केला, त्यात बहुमुल्य वेळ वाया गेला. पप्पु खत्री निश्‍चींत, पण गंभीर वाटत होता. नंतर मात्र आमचे टुनिंग छान जमु लागले.
दादासाहेब फाळके स्मारकापाशी स्पर्धेचा 81वा किलो मीटर पार केला तेव्हा आम्हाला कळून चुकले की, सगळे स्पर्धक बरोबर वेळेत दाखल झाले व दोन वगळता सगळ्यांनी सगळे टीसी, पीसी घेतले, त्यामुळे आपली स्पर्धा ही सहाव्या, सातव्या क्रमांकासाठी असेल.

संध्याकाळी साई-साया हॉटेलात बक्षिस वितरणासाठी हजेरी लावली. प्राथमिक निकाल बाहेर आला, त्यावेळी आम्ही चक्क चवथा क्रमांक पटकावला होता. पण अंतिम निकाल बाहेर आला आणि आश्‍चर्य घडले. आम्हाला चक्क तिसरा नंबर मिळाला होता. एअरटेल वन इंडिया रॅलीत पंचवीस लाखाच्या बक्षिसापर्यंत पोहाचेलेले अश्‍विन पंडित अनंत अडचणींना तोंड देत दुसऱ्या क्रमांकावर होते, तर गिरीश देवस्थळींच्या जोडीने जेतेपदाची बाजी मारली होती.
...अशा प्रकारे 2010ची सुरूवात धडाकेबाज झाली आहे. आणखी एक भव्य दिव्य, लाईफटाईम इव्हेंट थोडा पुढे ढकलला तो म्हणजे कोकण कडा रॅपलींग. अन्यथा माझ्यासाठी ऍडव्हेंचर स्पोर्टस्‌ फिल्डमध्ये हा ट्रिपल क्राऊन ठरला असता. अर्थात हा इव्हेंट होईल, तेव्हा मी त्यात सहभाग नक्की घेइन.

- प्रशांत परदेशी

No comments: