Wednesday, February 17, 2010

जिव्हाग्री टेकलें कवींठ


शिवरात्री : कवठाची गोडी अविट करणारा सण
----
नाशिक, ता. 11 : कवीठ किंवा कौठ या फळाचे आणि महाशिवरात्रीचे घनिष्ट नाते आहे. कवठाच्या प्रत्येक बीमधून शिवऽ शिवऽ ऐकु येते म्हणून कवठाचे सेवन केल्याने भाविक शिवमय होऊन जातात अशी मान्यता असल्याने हिंदूंमध्ये घराघरात कवठाचे पदार्थ खास शिवरात्रीला तयार केले जातात. कवठाची मिरची-कोथिंबीर कुटून केलेली चटणी तर अविट, पण चुरलेल्या गुळासोबत कवठाचा गर म्हणजे त्याचा स्वाद काय वर्णावा. गेल्या काही दिवसांपासून शेतांमधली कवठाची झाडे भरगच्च फळांनी लगडली आहेत. शिवरात्रीच्या बेताला ती पक्व होतील, अशा बेताने बळीराजाने ती गवतामध्ये पिकण्यासाठी दडपून ठेवली आहेत.

कैंसें एकचि केवढें पसरलें। त्रिभुवन जिव्हाग्री आहे टेकलें ।।
जैसें कां कवींठ घातलें। वडवानळीं।।
(एकच मुख-कसे व केवढे पसरले आहे? ज्या प्रमाणे वडवानळामध्ये कवठ घालावे त्याप्रमाणे हे तिन्हींही लोक तुझ्या जिभेच्या टोकालाच लागलेले दिसतात.) भारतीय संस्कृतीमध्ये वनमहात्मय धार्मिक आणि तात्त्विक विचारसरणीमध्ये जोपासले आहे. श्‍लोक 30मध्ये ज्ञानेश्‍वर माऊंलींनी सर्वव्यापी श्रीकृष्णाची तुलना करताना कवठाच्या अविट गोडीची महत्ती सांगितली आहे.
संस्कृतमध्ये कपित्थ, हिंदीत कैथा किंवा कैथ बेल, बंगालीत कोंथ बेल अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या कवठाला इंग्रजीत वुड ऍपल म्हणतात. तसे त्यांच्यात बऱ्याच फळांना आकार, रंगानुरूप बेरी किंवा ऍपल हे विशेषण चिकटवले तरी झाले. एलिफंड ऍपल हे नाव मात्र हत्तींना प्रिय फळ म्हणून किंवा मंकी फ्रुट - माकडांना प्रिय म्हणून पडले असावे.

बहुगीणी
हे फळ मुलत: भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका व इतर दक्षिण आशियाई राष्ट्रात प्रामुख्याने आढळते. पाश्‍चात्य देशात नैसर्गिक पेयामध्ये स्वाद वाढविण्यासाठी याचा वापर केला जातो. कवठापासून जॅम, जेली सुद्धा बनवतात. काही जण निरेची साखर व कवठाच्या गरातील तंतुंचा वापर करून उत्तम प्रतचे शरबत बनवतात, परंतू कवठाचे अखंड झाड हे बुगुणी आहे. कवठाचे लाकूड हे मजबुत व टिकाऊ असल्याने त्यांचा बांधकामात वापर होतो, त्याच प्रमाणे लाकडी मॉडेल्स बनविण्याकरिता त्याचा उपयोग होतो. त्याच्यावर नक्षीकामसुद्धा चांगल्या पद्धतीने होते. शेतीची अवजारा, फुटपट्ट्या, व यंत्राती भाग त्यापासून बनविले जातात.
पावसाळ्यापश्‍चात या झाडातून पांढरा डिंक निघतो, त्यापासून जलरंग, शाई, कपड्यांचे रंग, वॉर्निश तयार केले जाताता.
जुन्या काळी कवठाचा डिंक व चुना एकत्र करून क्रुत्रीम जलस्त्रोतांचे वॉटरप्रुफिंग केले जायचे असा उल्लेख जुन्या ग्रंथात आढळतो. जुन्या काळी तैलचित्रांचे संवर्धन करण्यासाठी या झाडाचा डिंग वापरला जायचा. तर गृहीणी या झाडापासून फेसाळणारा द्रव बनवून त्याचा वस्त्र स्वच्छ करण्यासाठी वापर करायच्या.
आरोग्यवर्धक
यजुर्वेदात कवठाचा उल्लेक आढळतो. चरक संहितेत शरीराच्या विविध व्याधींवर कंवठाचे उपयोग सांगितले आहे. पित्ताशय, अपचन, वायुविकारात कवठाचा मोठा लाभ सांगितला आहे. त्यासाठी कोवळा पाला दुध-साखर एकत्रकरून दिला जातो. आयुर्वेदशास्त्रात काळीज व हृदयाच्या आजारात हे लाभकारी मानले जाते. अतिसार व पोटाच्या विकारात कच्चे कौठ दिले जाते. ग्रामीण भागात सर्प, विंचू किंवा किटक चावल्यास झाडाची साल, फळाचा गर चावून त्याचा चोथा लावण्याची प्रथा आहे.
---

No comments: