Thursday, December 31, 2009

कृपया हे कधीही करू नका




Always Face to the ROCK
Nashik, 30 December 2009 :

"आपण निसर्ग यात्री आहोत', "इतिहासाचे आपल्याला ज्ञान आहे', "आपल्या महान संस्कृतीचा आपल्याला अभिमान आहे', असा समज जर कोणाच्या मनात निर्माण होत असेल तर त्यात काहीही गैर नाही, परंतू याचा गिरीभ्रमणाशी संबंध येतो कुठे? नेमके हेच न समजल्याने नाशिकच्या गुलालवाडी व्यायाम शाळेने चक्क किल्ले हरीहर गडावर एक "पिकनीक' काढली होती.
योगायोग म्हणजे आम्ही आमच्या दुचाकींवर भल्यासकाळी नाशिकहून हरिहर गडावर पाण्याचे एक टाके स्वच्छ करण्याच्या उद्देशाने आलो होतो. आम्हाला वाटले की ट्रेकर्सचा गट रात्री मुक्कामी असावा व तेच गड उतरताहेत. पण निट बघितल्यानंतर हे ट्रेकर्स नाहीत हे लांबुनच लक्षात आले. सर्व जण पायऱ्या व खडकांकडे पाठ करून आपल्या बॅगा सावरत उतरत होते. जवळ आल्यानंतर माहिती घेतली तेव्हा पहाटे पाचला येथे दाखल झालो होतो, असे उत्तर मिळाले. सहभागी प्रमुख्याने लहान मुले, युवक व काही मध्यमवयीन महिला होत्या व त्यांचा एक उत्तरवयीन ग्रुप लिडर होता.

डोंगराचे काही नियम असतात, त्याठिकाणी छोटासा अपघातही परवडण्यासारखा नसतो. परंतू गुलालवाडीच्या या गटाला ट्रेक व पिकनिक यात कोणताही फरक ठाऊक नव्हता. गट प्रमुख एकच सांगत होते, या (म्हणजे लहान किंवा अज्ञानात राहणाऱ्या) पिढीला आपण काही तरी द्यायचे या उद्देशाने इथे घेऊन आलो आहोत. गट-कोटावर शहरी माणसाने वावरणे व ग्रामीण-आदीवासींनी वावरणे यात पुष्कळ फरक आहे. अंगभूत ताकद, खडतर आयुष्य जगण्याची सवय आणि चढ-उताराच्या टेरेनशी एकरूप झालेली ही माणसे सहजपणे वावरताना दिसतात. शहरी माणुस त्यांच्यासारखा स्वच्छंदीपणे वावरायला लागला तर त्यांचे भयंकर परिणाम घडू शकतात. असे नाही की शहरी माणसात कमी ताकद असते, किंवा त्यांची पावले निसरड्या वाटेवर ग्रीप घेऊ शकत नाही. परंतू सवय नसलेला शहरी माणूस निसटून डोंगर-दऱ्यात एक दोन नव्हे, अनेक अपघात झाले आहेत. पाठीवर सॅक असेल तर कधीही खडकाकडे तोंड करून डोंगर-कपारी, किंवा लहानात लहान दरी उतरण्याचा प्रघात आहे.
गुलालवाडी व्यायाम शाळेने अशा अवघड किल्ल्यावर पिकनिक काढताना मुलांना व महिलांना सुरक्षितपणे उतरविण्याची कोणतीही काळजी घेतली नव्हती. सरते शेवटी सर्व जण सुखरूप उतरले. (ज्या अर्थी दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात कुठल्याही दुर्घटनेचे वृत्त छापून आले नाही) परंतू ही मंडळी या मोहिमेचा काय अनूभव घेऊन जाणार! गड-किल्ल्यांवर जाणे खडतर, जीवघेणे असते? गडाच्या अवघड, सरळसोट, निसरड्या, मोडकळलेल्या पायऱ्या समोर तोंड करून उतरा? अशा चुकीच्या संकल्पना मनात रूजणे धोकादायक.

गड-किल्ल्यांवर फिरायला जाताना अनुभवी मंडळींच्या मार्गदर्शनाखालीच मोहिमा करणे इष्ट आहे. मागे काही डॉक्‍टर मंडळींनी एक क्‍लब काढून गडांवर भन्नाट वेगात फिरण्याचा सपाटा लावला होता. जणू क्रॉस कंट्री शर्यतीत सहभाग घेतल्यागत ही मंडळी अवघ्या काही तासात गड फिरून यायची. सुरूवातीला काही घडले नाही, परंतु वेगात चालल्याने व अवघड जागी कोणत्याही सुरक्षा यंत्रणेशिवाय चढल्याने काही मंडळीं घसरून पडली. दैव बलवत्तर म्हणून कोणाचा जीव गेला नाही, परंतू मग या घटनांनी खच्चीकरण होऊन या मंडळींनी गडांकडे जाणे कमी करून टाकले. त्या ऐवजी अनूभवी मंडळींच्या मार्गदर्शनाखाली हा छंद जोपासला असता, तर आरामात एकेक मोहिम पारपडली असती, शिवाय आपल्या सोबतच्या कॅमेऱ्यातून सह्याद्रीच्या विविध छटा एव्हाना त्यांच्या संचात सामील झाल्या असत्या.

No comments: