सात हजार वृक्षांचे रोपण...
नाशिक - कुऱ्हाडीच्या घावांनी लक्षावधी वृक्ष जमिनदोस्त केल्याने जंगल म्हणावे अशी ठिकाणे अगदी मोजकीच शिल्लक राहिलीत. अशा मोजक्या जंगलांमध्ये बोरगड परिसराची गणना होत असुन इथल्या निसर्ग संपदेला ‘चार चांद’ लावण्याचे प्रयत्न गेल्या काही वर्षांपासुन सुरु आहे. त्यात यंदा सुमारे सात हजार वृक्षांच्या रोपणाने भर पडली.
महिन्या, दिडमहिन्यांच्या पावसाने जवळपास सर्वच ठिकाणी डोंगर-दऱ्या हिरव्या शालुने नटुन थटुन उभ्या आहेत. नाशिकपासुन सुमारे 13 किलो मीटर अंतरावर असलेल्या बोरगड परिसरातील हिरवी नवलाई मात्र सर्वांपेक्षा वेगळी म्हणायला हवी.
भारतीय वायुदलाने महत्वपूर्ण दळणवळण केंद्राच्या निमीत्ताने संपुर्ण बोरगड किल्ल्याचे अधिग्रहण केले आणि त्याच बरोबर बोरगडच्या परिसरात लोकांना ये-जा करण्यावर बंधने आलीत.
सेनादलाच्या या निर्बंधांमुळेच कदाचित बोरगडच्या निसर्गसंपदेला वरदान लाभले आहे. विशेष म्हणजे गडाच्या पायथ्यालगतच्या तुंगलदरा ग्रामस्थांमध्ये वृक्षांबद्दल आस्था दिसुन येते, त्यामुळेच इथल्या जंगलात पक्षी व वन्यजीव केवळ स्थलांतरासाठी किंवा भक्ष्य शोधण्याकरिता येत नाहीत, तर प्रजननाकरिता सुद्धा येऊ लागल्याचे नेचर कन्झर्वेशन सोसायटी-नाशिकच्या पाहणीत आढळून आले आहे.
बोरगड परिसरात वृक्ष वाढविणे हे जास्त सुरक्षीत असल्याचे मानुन नेचर कन्झर्वेशन सोसायटी-नाशिकने गेल्या काही वर्षांपासुन बोरगड परिसरात निसर्ग संवर्धनेचे कार्य सुरु केले आहे.
यंदा महिंद्र ऍन्ड महिंद्र यांनी नेचर कन्झर्वेशन सोसायटी-नाशिकच्या प्रयत्नांना एक लाख वृक्ष लावण्याकरिता सक्रीय मदत करण्याचे मान्य केले असुन त्याच्या पहिल्या टप्प्यात शनिवारी व रविवारी सुमारे 7000 वृक्षांचे रोपण करण्यात आले.
या वृक्षरोपण मोहिमेत महिंद्र ऍन्ड महिंद्र कंपनीच्या सुमारे साडे तीनशे कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. त्याच प्रमाणे तुंगलदरा येथील ग्रामस्थ, एअर फोर्स कॉलनी, तुंगलदरा व आशेवाडी, नाशिकच्या होरायझन ऍकॅडमी, सेंट लॉरेन्स शाळेच्या मुले व मुलींनी दोन दिवसात सातहजारहून अधिक वृक्षांचे रोपण केले.
बोरगड परिसरात दाट झाडी आहेच, त्यात काही मोकल्या भागात हे वृक्ष लावण्यात आले आहेत . आंबा, मोह, हिरडा, बेहडा, शिवण, खैर, जांभुळ, चिंच, बोर, आपटा, कांचन, अडूळसा, कवट इत्यादी स्थानिक वृक्षाची रोपांची लागवड करण्यात आली.
या मोहिमेत महिंद्र ऍन्ड महिंद्राच्या नाशिक प्लॅन्टचे उपाध्यक्ष विजय धोंगडे त्याच प्रमाणे एच.डी.आहेर, उदय वैद्य, विजय खानोलकर, सतिष गोगटे, गोविंद पित्रे, चंद्रकांत भांडे यांनी सहभाग घेतला.
वनविभागाने या मोहिमेला भरभरून सहाय्य केले. नाशिक सर्कलचे वनसंरक्षक व्ही.के.मोहन, उपवनसंरक्षक ए.एस. पाटील यांनी उपस्थित राहून वृक्षरोपणो महत्व विद्यार्थ्यांना विषद केले.
एन.सी.एस.एन.चे अध्यक्ष विश्वरूप राहा, सचिव नारायण भूरे, कुमुदिनी बंगेरा, अभिलाष बोटेकर, एस.बी.पाटील, अजित बर्जे, हेमंत आगाशे आदींनी सुमारे आठवडाभर या मोहिमेची तयारी करवुन घेतली. त्याच प्रमाणे वृक्षारोपणाकरिता सात हजाराहून अधिक खड्ड्यांची तयारी विविध यंत्रणांच्या मदतीने करून घेतली.
No comments:
Post a Comment