तुरुंगाच्या सुरक्षेला पत्रकारांकडुन धोका?
2007-06-21
(प्रशांत परदेशी)
नाशिक - ‘नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेला पत्रकारांपासुन धोका पोहचु शकतो!’, हा कोण्या गुप्तचर खात्याचा अहवाल नाही, हा फतवा काढण्याचे महनिय कार्य केले आहे नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहाचे अधिक्षक अशोक राणे यांनी.
गुरूवारी सकाळी 11 वाजता नाशिकच्या व्यापारी व उद्योजकांच्या शिष्ट मंडळाने नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात चालणाऱ्या उद्योग धंद्याची माहिती जाणून घेण्याकरिता एका खास भेटीचे आयोजन केले होते.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ऍन्ड इंडस्ट्रीजच्या नाशिक शाखेच्या वतिने हा दौरा करण्यात आला होता. सोबत शहरातील काही व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी हजर होते.
व्यापार उद्यम व प्रसिद्धी यांचे अतुट नाते आहे, त्यामुळे महाराष्ट्र चेंबरच्या पदाधिकाऱ्यांनी काही पत्रकारांना या पाहणी दौऱ्याची माहिती देऊन खास आमंत्रीत केले होते.
कारागृहातील नियमांची माहिती जाणून घेत 51 जणांचे शिष्ट मंडळ हातात लाल गुलाब पुष्प घेऊन मुख्य प्रवेश द्वारातुन आतल्या प्रवेश द्वारात सुरक्षेचे सर्व सोपस्कर पुर्ण करून दाखल झाले.
आता कारागृहात प्रवेश करणे बाकीच होते, तेव्हा एका पदाधिकाऱ्याने तुरूंग अधिक्षकांना तिघा पत्रकारांची ओळख करून दिली, तत्क्षणी लाल गुलाबाचे फुल देण्याकरिता पुढे सरसावलेले अशोक राणेंचे हात अचानक थबकले.
मी पत्रकारांना आत जाऊ देणार नाही, असं स्पष्ट करून त्यांनी कसं बसं गुलाबाचं फुल पत्रकारांच्या पुढे धरलं. त्यानंतर व्यापारी व उद्योजकांनी हे पत्रकार नेहमी व्यापार, उद्यामाशी संबंधित माहिती कव्हर करतात, असं सांगुन समजावण्याचा प्रयत्न केला.
सुमारे पंधरा ते वीस मिनीटे तुरूंग अधिक्षक व व्यापाऱ्यांचे शिष्ट मंडळ यांच्यात पत्रकारांना आत घेण्यावरून बातचीत सुरू होती, परंतु तुरूंगाची सुरक्षा महत्वाची आहे, असे निक्षून सांगत राणे यांनी सुरक्षेच्या कारणास्तव पत्रकारांना आत नेताच येणार नाही, असा निर्धार बोलुन दाखवला.
ही चर्चा सुरू असताना पत्रकारही आपल्याला आत जाऊन उद्योग धंद्याची माहिती घेण्याची परवानगी मिळेल या उद्देशाने थांबुन राहिले होते, अखेर राणे यांनीच जवळ येऊन तुम्हाला सुरक्षेच्या कारणावरून आत जाता येणार नाही, असे सांगुन बाहेर जायला सांगितले.
एका महिला पत्रकारासह तिघा पत्रकारांनी राणेंना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु राणे आपल्या निर्णयावर ठाम राहिले, त्यामुळे तिघा पत्रकारांवर रिकाम्या हातेने माघारी फिरण्याची पाळी आली.
नाशिक शहरातुन 8 किलो मीटरचा प्रवास करून आलेल्या तिघा पत्रकारांना रिकाम्या हाताने परतावे लागणार होते. शिवाय बातमी मिळू शकली नाही, असे वरिष्ठांना सांगावे लागणार होते. ये-जा करण्यात गेलेला दिड-दोन तासाचा मौल्यवान वेळ हा वेगळाच.
जाता जाता, महिला पत्रकाराने गांधिगीरी पद्धतीने निषेध नोंदविण्याकरिता पोलिसास गुलाब पुष्प देण्याचा प्रयत्न केला, परंतु अक्षरश: पळ काढत या पोलिसाने गांधिगिरी निषेधही उधळून लावला.
http://www.nasikupdate.com/newsdet.php?msgid=1456&lang=M
No comments:
Post a Comment