Tuesday, July 17, 2007

Should These Plants live...

सात हजार वृक्षांचे रोपण...
नाशिक - कुऱ्हाडीच्या घावांनी लक्षावधी वृक्ष जमिनदोस्त केल्याने जंगल म्हणावे अशी ठिकाणे अगदी मोजकीच शिल्लक राहिलीत. अशा मोजक्या जंगलांमध्ये बोरगड परिसराची गणना होत असुन इथल्या निसर्ग संपदेला ‘चार चांद’ लावण्याचे प्रयत्न गेल्या काही वर्षांपासुन सुरु आहे. त्यात यंदा सुमारे सात हजार वृक्षांच्या रोपणाने भर पडली.
महिन्या, दिडमहिन्यांच्या पावसाने जवळपास सर्वच ठिकाणी डोंगर-दऱ्या हिरव्या शालुने नटुन थटुन उभ्या आहेत. नाशिकपासुन सुमारे 13 किलो मीटर अंतरावर असलेल्या बोरगड परिसरातील हिरवी नवलाई मात्र सर्वांपेक्षा वेगळी म्हणायला हवी.


भारतीय वायुदलाने महत्वपूर्ण दळणवळण केंद्राच्या निमीत्ताने संपुर्ण बोरगड किल्ल्याचे अधिग्रहण केले आणि त्याच बरोबर बोरगडच्या परिसरात लोकांना ये-जा करण्यावर बंधने आलीत.


सेनादलाच्या या निर्बंधांमुळेच कदाचित बोरगडच्या निसर्गसंपदेला वरदान लाभले आहे. विशेष म्हणजे गडाच्या पायथ्यालगतच्या तुंगलदरा ग्रामस्थांमध्ये वृक्षांबद्दल आस्था दिसुन येते, त्यामुळेच इथल्या जंगलात पक्षी व वन्यजीव केवळ स्थलांतरासाठी किंवा भक्ष्य शोधण्याकरिता येत नाहीत, तर प्रजननाकरिता सुद्धा येऊ लागल्याचे नेचर कन्झर्वेशन सोसायटी-नाशिकच्या पाहणीत आढळून आले आहे.


बोरगड परिसरात वृक्ष वाढविणे हे जास्त सुरक्षीत असल्याचे मानुन नेचर कन्झर्वेशन सोसायटी-नाशिकने गेल्या काही वर्षांपासुन बोरगड परिसरात निसर्ग संवर्धनेचे कार्य सुरु केले आहे.


यंदा महिंद्र ऍन्ड महिंद्र यांनी नेचर कन्झर्वेशन सोसायटी-नाशिकच्या प्रयत्नांना एक लाख वृक्ष लावण्याकरिता सक्रीय मदत करण्याचे मान्य केले असुन त्याच्या पहिल्या टप्प्यात शनिवारी व रविवारी सुमारे 7000 वृक्षांचे रोपण करण्यात आले.


या वृक्षरोपण मोहिमेत महिंद्र ऍन्ड महिंद्र कंपनीच्या सुमारे साडे तीनशे कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. त्याच प्रमाणे तुंगलदरा येथील ग्रामस्थ, एअर फोर्स कॉलनी, तुंगलदरा व आशेवाडी, नाशिकच्या होरायझन ऍकॅडमी, सेंट लॉरेन्स शाळेच्या मुले व मुलींनी दोन दिवसात सातहजारहून अधिक वृक्षांचे रोपण केले.


बोरगड परिसरात दाट झाडी आहेच, त्यात काही मोकल्या भागात हे वृक्ष लावण्यात आले आहेत . आंबा, मोह, हिरडा, बेहडा, शिवण, खैर, जांभुळ, चिंच, बोर, आपटा, कांचन, अडूळसा, कवट इत्यादी स्थानिक वृक्षाची रोपांची लागवड करण्यात आली.


या मोहिमेत महिंद्र ऍन्ड महिंद्राच्या नाशिक प्लॅन्टचे उपाध्यक्ष विजय धोंगडे त्याच प्रमाणे एच.डी.आहेर, उदय वैद्य, विजय खानोलकर, सतिष गोगटे, गोविंद पित्रे, चंद्रकांत भांडे यांनी सहभाग घेतला.


वनविभागाने या मोहिमेला भरभरून सहाय्य केले. नाशिक सर्कलचे वनसंरक्षक व्ही.के.मोहन, उपवनसंरक्षक ए.एस. पाटील यांनी उपस्थित राहून वृक्षरोपणो महत्व विद्यार्थ्यांना विषद केले.


एन.सी.एस.एन.चे अध्यक्ष विश्वरूप राहा, सचिव नारायण भूरे, कुमुदिनी बंगेरा, अभिलाष बोटेकर, एस.बी.पाटील, अजित बर्जे, हेमंत आगाशे आदींनी सुमारे आठवडाभर या मोहिमेची तयारी करवुन घेतली. त्याच प्रमाणे वृक्षारोपणाकरिता सात हजाराहून अधिक खड्‌ड्यांची तयारी विविध यंत्रणांच्या मदतीने करून घेतली.

Monday, July 2, 2007

Journalist R threat for Prision security.....

तुरुंगाच्या सुरक्षेला पत्रकारांकडुन धोका?

2007-06-21

(प्रशांत परदेशी)

नाशिक - ‘नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेला पत्रकारांपासुन धोका पोहचु शकतो!’, हा कोण्या गुप्तचर खात्याचा अहवाल नाही, हा फतवा काढण्याचे महनिय कार्य केले आहे नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहाचे अधिक्षक अशोक राणे यांनी.

गुरूवारी सकाळी 11 वाजता नाशिकच्या व्यापारी व उद्योजकांच्या शिष्ट मंडळाने नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात चालणाऱ्या उद्योग धंद्याची माहिती जाणून घेण्याकरिता एका खास भेटीचे आयोजन केले होते.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ऍन्ड इंडस्ट्रीजच्या नाशिक शाखेच्या वतिने हा दौरा करण्यात आला होता. सोबत शहरातील काही व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी हजर होते.

व्यापार उद्यम व प्रसिद्धी यांचे अतुट नाते आहे, त्यामुळे महाराष्ट्र चेंबरच्या पदाधिकाऱ्यांनी काही पत्रकारांना या पाहणी दौऱ्याची माहिती देऊन खास आमंत्रीत केले होते.

कारागृहातील नियमांची माहिती जाणून घेत 51 जणांचे शिष्ट मंडळ हातात लाल गुलाब पुष्प घेऊन मुख्य प्रवेश द्वारातुन आतल्या प्रवेश द्वारात सुरक्षेचे सर्व सोपस्कर पुर्ण करून दाखल झाले.

आता कारागृहात प्रवेश करणे बाकीच होते, तेव्हा एका पदाधिकाऱ्याने तुरूंग अधिक्षकांना तिघा पत्रकारांची ओळख करून दिली, तत्क्षणी लाल गुलाबाचे फुल देण्याकरिता पुढे सरसावलेले अशोक राणेंचे हात अचानक थबकले.

मी पत्रकारांना आत जाऊ देणार नाही, असं स्पष्ट करून त्यांनी कसं बसं गुलाबाचं फुल पत्रकारांच्या पुढे धरलं. त्यानंतर व्यापारी व उद्योजकांनी हे पत्रकार नेहमी व्यापार, उद्यामाशी संबंधित माहिती कव्हर करतात, असं सांगुन समजावण्याचा प्रयत्न केला.

सुमारे पंधरा ते वीस मिनीटे तुरूंग अधिक्षक व व्यापाऱ्यांचे शिष्ट मंडळ यांच्यात पत्रकारांना आत घेण्यावरून बातचीत सुरू होती, परंतु तुरूंगाची सुरक्षा महत्वाची आहे, असे निक्षून सांगत राणे यांनी सुरक्षेच्या कारणास्तव पत्रकारांना आत नेताच येणार नाही, असा निर्धार बोलुन दाखवला.

ही चर्चा सुरू असताना पत्रकारही आपल्याला आत जाऊन उद्योग धंद्याची माहिती घेण्याची परवानगी मिळेल या उद्देशाने थांबुन राहिले होते, अखेर राणे यांनीच जवळ येऊन तुम्हाला सुरक्षेच्या कारणावरून आत जाता येणार नाही, असे सांगुन बाहेर जायला सांगितले.

एका महिला पत्रकारासह तिघा पत्रकारांनी राणेंना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु राणे आपल्या निर्णयावर ठाम राहिले, त्यामुळे तिघा पत्रकारांवर रिकाम्या हातेने माघारी फिरण्याची पाळी आली.

नाशिक शहरातुन 8 किलो मीटरचा प्रवास करून आलेल्या तिघा पत्रकारांना रिकाम्या हाताने परतावे लागणार होते. शिवाय बातमी मिळू शकली नाही, असे वरिष्ठांना सांगावे लागणार होते. ये-जा करण्यात गेलेला दिड-दोन तासाचा मौल्यवान वेळ हा वेगळाच.

जाता जाता, महिला पत्रकाराने गांधिगीरी पद्धतीने निषेध नोंदविण्याकरिता पोलिसास गुलाब पुष्प देण्याचा प्रयत्न केला, परंतु अक्षरश: पळ काढत या पोलिसाने गांधिगिरी निषेधही उधळून लावला.

http://www.nasikupdate.com/newsdet.php?msgid=1456&lang=M

राष्ट्रीय संपत्तीची हेळसांड ...


कसारा घाटाच्या अस्तित्वास आव्हान देणारी 'रोड ट्रेन'...
राष्ट्रीय संपत्तीची हेळसांड ...महामार्ग क्र.3चे दुय्यम स्थान!


-(प्रशांत परदेशी)
नाशिक (29/6/2007) - कसारा घाटातील किलो मीटर क्रमांक 471वर एक 'रोड ट्रेन' गेल्या 45 दिवसांपासुन पडुन आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या कुतुहलाचा विषय ठरलेला हा अजस्त्र ट्रक म्हणजे घाटातुनच अवजड सामान वाहुन नेण्याच्या अट्टाहासाचा आदर्श नमुना असुन महामार्ग पोलिसांचे प्राण मात्र या रोड ट्रेनने अक्षरश: कंठाशी आणले आहेत.
इंग्रजी सिनेम्यात भरपुर चाके असणारे आणि भल्या मोकळ्या महामार्गावरून दिड-पावणे दोनशे किलो मीटर वेगाने धावणारे ट्रक बऱ्याचदा दृष्टीस पडतात. काही देशात असं भलं मोठं आकामान असलेल्या ट्रकला सेमी ट्रेलर ट्रक म्हणतात, तर काही देशात ट्रान्सफर ट्रक, 18 व्हीलर, बिग रीक, आर्टिक्युलेटेड लॉरी (आर्टिक) असेही संबोधतात.


इंग्लंड, आयर्लंड, न्यूझीलंडमध्ये अशा महाकाय ट्रक्सला ट्रक व ट्रेलर म्हणतात, तर ब्रिटीश जगरनट असेही संबोधतात. अर्थात लोकसंख्या कमी आणि सुबत्ता जास्त, त्यामुळे विकसीत देशांतल्या महामार्गांना अशी अजस्त्र वाहने साजेशीच म्हणायला हवी. एकाच वेळी भरपूर माल किंवा अवजड वस्तु रस्त्याने वाहुन नेण्याचा या पेक्षा दुसरा चांगला मार्ग नाही.


भारतीय रस्ते महाकाय आकाराच्या ट्रक ची ये-जा करण्याकरिता उपयुक्त आहेत? या प्रश्नाचं उत्तर नाही असंच देता येईल. मेाजक्याच ठिकाणच्या रस्त्यांवरून 36, 40, 60, 80 किंवा 100 टायर्स असलेल्या अजस्त्र ट्रकवरून सामान किंवा अवजड वाहतुक केली जाऊ शकते, मात्र असं मोठ्ठ वाहन रस्त्यावरून धावत असेल तर वाहतुकीवर केवढा ताण निर्माण होईल हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही.


नाशिकमधुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरून असाच एक अजस्त्र ट्रेलर रस्ता पार करण्याकरिता आतुर झाला आहे. त्याकरिता या ट्रेलरला फक्त कसारा घाट चढून देशावर यावे लागेल इतकेच!


या ट्रकला केवळ 320 चाके आहेत! अबब! म्हणण्याची पाळी आणणाऱ्या हा अजस्त्र ट्रेलर तयार करण्यामागे एखादा विक्रम करण्याची मनिषा असावी की नाही, हे सांगता येणार नाही, परंतु हा अजस्त्र ट्रेलर कसारा घाटाच्या मध्यात येऊन थांबला आहे.


तसं घाटात आगमन होऊन त्यास 45 दिवसांहून अधिक काळ लोटला आहे. परंतु महामार्ग पोलिसांकडून हिरवा कंदील मिळायला तयार नसल्याने या ट्रेलरची स्वारी एका छोट्या बायपासवर पार्क होऊन बसली आहे.


नासिक अपडेटने डोळे दिपवणाऱ्या या वाहनातुन काय नेण्याचं प्रयोजन आहे याची माहिती जाणून घेतली तेव्हा एकुणच प्रकार मती गुंग करणारा ठरला.


छत्तीसगडमधल्या सिपत येथे राष्ट्रीय औष्णिक विद्युत केंद्राचा वीज निर्मीती प्रकल्प आहे. या प्रकल्पात वीज निर्मीतीकरिता लागणारा एक महत्वाचा पार्ट खास रशियातुन तयार करून मागविण्यात आला.


जलमार्गे मुंबई जवळील बंदरात दाखल झालेल्या या पार्टचे वजन आहे फक्त 205टन आणि तो एका 150 टनी पुलओव्हरच्या मध्ये चपखल ठेवण्यात आला आहे.


एकुण 355 टनी भार छत्तीसगडपर्यंत कसा वाहुन न्यायचा याचा फारसा अभ्यास करण्यात आला नसावा. इटली व ऑस्ट्रेलियातील वाहतुक तज्ञांना या विषयी विचारणा करण्यात आली होती. या तज्ञांनी पाहणी केल्यानंतर कसारा घाटातुन हा ट्रेलर पास होणं अशक्यप्राय: असल्याचा अहवाल दिला होता.


अभ्यासु अहवालाकडे डोळेझाक करून जे.एम. बक्षी ऍन्ड कंपनीने डॉकमधुन हा अजस्त्र ट्रेलर थेट राष्ट्रीय महामार्ग क्र. 3 वरून दामटवला. 10 मे, 2007 रोजी घाटाच्या मध्यावर या ट्रेलरला छोटासा अपघात झाला, परंतु त्यामुळे घाटातली वाहतुक तब्बल 7 दिवस ठप्प झाली होती.


58 फुट लांबीचा हा ट्रेलर घाटातल्या अरूंद वळणावरून कसा दामटणार! याचे उत्तर ना जे एम बक्षी कंपनीकडे होते ना एनटीपीएस अधिकाऱ्यांकडे.


रशियाकडे तब्बल 150 कोटी रूपये मोजुन तयार करण्यात आलेला हा महत्वाचा काम्पोनंट सिपतच्या उर्जा प्रकल्पाकरिता तातडीने हवा आहे. तो कसारा मार्गे वाहुन नेणे शक्य नसल्याने महामार्ग पोलिसांचे उपआधिक्षक श्रीकांत जावळे यांनी हा डायनॉसॉर कसाबसा घाटात उलट्या दिशेने खालु उतरवला. या रोड ट्रेनला दोन्ही बाजुंनी रेल्वे प्रमाणेच इंजिन जोडून चालविण्याची सोय आहे.


जावळेंनी आता ही 'रोड ट्रेन' कसाऱ्यातुन जाणार नाही! असा पवित्रा घेतला आहे. देव न करो, परंतु जर ही रोड ट्रेन घाटात फसुन अपघात झाला तर तीन ते चार वर्ष घाटाची वाहतुक पूर्णपणे बंद होण्याचा गंभीर इशारा जावळेंनी दिला आहे. या इशाऱ्याकडे लक्ष देऊन हा ट्रेलर ठाणे, घोडबंदर मार्गे अहमदाबादहून उत्तर भारताकडे नेणे व्यवहार्य असताना एक तर प्रतिष्ठेचा प्रश्न केल्याने किंवा लांबच्या रस्त्यावरून अधिक खर्चिक होईल या हिशेबाने ही 'रोड ट्रेन' घाटातच पडुन आहे.


शुक्रवारी नासिक अपडेटने घाटात जाऊन 'रोड ट्रेन'ची पाहणी केली तेव्हा कंपनीचा एक अधिकारी वाहनाचे फोटो कशाला काढतात असे म्हणुन अंगावर धावुन आला. तसेच आपण पंजाबी असुन आपली खोपडी सरकली तर आपण काय करू शकतो याची आपणाला कल्पना नसल्याची धमकीच जे.एम. बक्षी कंपनीच्या अधिकाऱ्याने दिली.


सार्वजनिक ठिकाणी अत्यंत महत्वाच्या मार्गावर वाहतुकीचा सात दिवस खेळखंडोबा करूनही या वाहतुक कंपनीचा आत्मा शांत झाला नसावा. पोलिसांवर राग व्यक्त करण्याऐवजी माध्यमाच्या प्रतिनिधींवर जे.एम. कंपनीचे अधिकारी राग व्यक्त करून मोकळे झाले.


'उचलली जीभ लावली टाळ्याला', या उक्ती प्रमाणे, 'उचलली ट्रक लावली कसाऱ्याच्या मार्गाला', असा वाहतुक कंपन्यांचा ग्रह झाला असुन राज्यकर्ते व सरकारी अधिकारी आपल्या खिशात असल्यागत वावरण्याच्या प्रवृत्तीतुनच राष्ट्रीय संपत्ती अशी धुळ खात पडुन राहीली आहे.


कसाऱ्यात पाऊस हा सदोदिसत सुरू असतो, त्यातच घाटात दरडी कोसळणे, खडक निखळणे, लहान मोठे अपघात सुरु असतात. या अपघात कैक किलोमीटरच्या रांगा लागुन राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान होतोच शिवाय प्रवाशांचे व वाहतुकदारांचे आतोनात हाल होतात.


राज्य सरकारने कसारा घाटातल्या वाहतुकीचे विशेष नियमन करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. अन्यथा चौपदरीकरण्याच्या फुटकळ प्रयत्नात अडकुन न राहता किमान आठपदरीकरणाची तसदी राज्यकर्त्यांना व प्रशासकीय अधिकाऱ्यांना घेणे गरजेचे आहे. ही तसदी घेतली गेली नाही, तर मात्र घाटात वाहतुक फसुन कोट्यावधी रूपयांचा चुराडा होईलच शिवाय लोकांना आतोनात हाल आपेष्टांना सामोरे जावे लागेल. लाल दिव्यातुन प्रवास करणारे याचा गांभीर्याने विचार करतील का?

http://www.nasikupdate.com/newsdet.php?msgid=1492&lang=M