Saturday, September 13, 2008
हळदीच्या ताटव्यात सोनेरी मंडुक
नाशिकमध्ये आढळले दुर्मिळ बेडूक
प्रशांत परदेशी ः
नाशिक, ता. 21 : बसगड-उतवड परिसरात "वैनतेय' गिर्यारोहण, गिरिभ्रमण संस्थेच्या कार्यकर्त्यांना नुकतेच पिवळ्या, सोनेरी रंगाच्या दुर्मिळ बेडकीचे दर्शन झाल्याने निसर्गप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.
नाशिक जिल्ह्यात जंगलांचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास झाला आहे. त्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर जैवविविधता नष्ट झाली. दुर्गम भागात काही ठिकाणी अजूनही दाट झाडी टिकून आहे. त्यापैकीच एक म्हणजे ठाणे जिल्ह्याच्या सीमेवरील बसगड व उतवडचा परिसर. रानवाटा तुडविण्याचा छंद असलेली मंडळी या गडांच्या वाटेला फारशी जात नाही, याचे प्रमुख कारण म्हणजे या गडांचा इतिहास उपलब्ध नाही. त्यावर मुक्कामाची सोय नाही, की पाण्याचे प्राचीन किंवा नैसर्गिक तलाव नाहीत.
जव्हार व घोटी-इगतपुरीकडील आदिवासीबांधव पायी ये-जा करण्यासाठी निरगुडपाडा, कळमुस्ते, जांभुळपाडा, शेरीचा पाडा, काचुर्ली या मार्गांचा वापर करत असले तरी उतवडकडे सहसा पायपीट होत नाही. त्यामुळे उतवडच्या बाजूला माणसांची ये-जा कमी असल्याने त्याठिकाणी अनेक जैवविविधता काही प्रमाणात टिकून आहे. "वैनतेय'च्या मोहिमेदरम्यान या गोष्टीची प्रचीती आली.
दोन किल्ल्यांची खिंड ओलांडून हळदीच्या ताटव्यातून जाताना बसगडच्या दरीत हळदीच्या पानावर सोनेरी-पिवळ्या रंगाच्या दुर्मिळ बेडकीचे दर्शन घडल्याने मोहिमेत सहभागींचा आनंद गगनात मावेनासा झाला. या बेडकीच्या पायांच्या रचनेवरून ती झाड व पानांवर अधिक राहत असावी. छायाचित्र टिपताना बेडकी निर्धास्तपणे बसून होती, नंतर धोक्याची चाहूल लागल्याने तिने आपले शरीर फुगवून दाखविले.
सुमारे दहा मिनिटे बेडकीचे दर्शन घेतल्यानंतर मोहिमेतील कार्यकर्त्यांनी तिला तिच्या नैसर्गिक ठिकाणी तसेच सोडून पुढचा रस्ता धरला.
यंदा श्रावणात आषाढधारा धरल्याने बसगड व उतवड परिसरात नद्या, नाले भरभरून वाहत आहेत. अनेक प्रकारच्या वनस्पतींनी हा परिसर फुलला असून, आदिवासी बांधवांनी पेरणी केलेली भात, नागली, वरईची पिके चांगली रुजल्याचे चित्र दिसत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment