Friday, December 12, 2008

सर्वात अवघड बाजुने धोडप सुळका सर


Dike formation at Dhodap Fort, white spots at the far extreme are of Saptashrungi, Vani.

नाशिकचे गिर्यारोहक : सातमाळ रांगेतील सर्वांत उंच व अवघड मोहीम फत्ते प्रशांत परदेशी ः सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. 10 : आपले राकट, पिळदार, पुरुषी सौंदर्य ल्यालेल्या सातमाळ रांगेतील सर्वांत उंच अशा धोडप गडावरील पाचशे फूट उंचीचा सुळका नाशिकच्या दोन गिर्यारोहकांनी सर्वांत अवघड अशा पश्‍चिम बाजूने प्रथमच सर करण्याचा पराक्रम केला. "वैनतेय' संस्थेचे समीरण कोल्हे व सोमदत्त म्हस्कर यांच्या या अलौकिक पराक्रमामुळे महाराष्ट्राच्या गिर्यारोहण इतिहासात आणखी एक मानाचे पान लिहिले गेले आहे.
धोडंबे (ता. चांदवड) गावाजवळ व्हेल्कॅनिक प्लगची रचना असलेला सुळका व त्यापासून निघालेल्या निरुंद सोंडेच्या डाईक पद्धतीच्या अनोख्या रचनेमुळे आपले वेगळेपण जोपासणारा चार हजार 761 फूट उंचीचा धोडप किल्ला. एका निरुंद माचीवर "एखादा डोंगरच आणून ठेवला असावा' अशा आविर्भावात उभा असलेला निसर्गनिर्मित वास्तुशिल्पाचा हा अप्रतिम आविष्कार मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून येता-जाता सहजगत्या दृष्टीस पडतो. या गडावर असलेल्या 500 फूट उंचीच्या सुळक्‍यावर परंपरागतरीत्या पूर्वेकडून चढाई होते. महाराष्ट्राच्या गिर्यारोहणाचा प्रमुख ग्रंथ म्हणून मान्यता असलेल्या "सांगाती सह्याद्रीचा' या हृषीकेश यादव यांनी संपादित केलेल्या ग्रंथात धोडप सुळक्‍यावर पूर्व दिशेने चढाईचा मार्ग दर्शविण्यात आला आहे. या बाजूने हा सुळका सोप्या श्रेणीत गळला जातो.
"वैनतेय'च्या गिर्यारोहकांनी सर्वांत अवघड अशा पश्‍चिम बाजूने शनिवारी (ता. 6) साडेचार तासांत चढाई करून एक नवा मार्ग खुला केला. समीरण कोल्हे या धाडसी गिर्यारोहकाने छत्रपती शिवाजी महाराज व सप्तशृंगी देवीचे नामस्मरण करून सकाळी आठला चढाईस सुरवात केली. दुपारी चार वाजून तीस मिनिटांनी समीरण सर्वांत प्रथम शिखरावर पोचला व त्याबरोबरच उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत उंच व नव्या मार्गावरची मोहीम फत्ते झाली. पाठोपाठ सोमदत्त म्हस्कर हा झुमारिंग करीत वर दाखल झाला आणि "वैनतेय'च्या दोन गिर्यारोहकांनी अत्यंत अवघड अशा बाजूने धोडप सुळका सर केला.
पंधराच दिवसांपूर्वी रायगडावरील लिंगाणा सुळका 24 तासांच्या चढाईत सर केल्याने धोडप सुळक्‍यावरचा नवा मार्ग उघडण्यात यश येणार, असा आत्मविश्‍वास होता. सुदैवाने हवामान चांगले असल्याने धोडपची मोहीम फत्ते झाल्याची प्रतिक्रिया सोमदत्त याने "सकाळ'शी बोलताना दिली.
आजमितीला नाशिकचा सर्वांत गुणी गिर्यारोहक म्हणून मान्यता असलेल्या समीरणने सांगितले, की तीन वर्षांपूर्वी "वैनतेय'च्या एका रात्री पदभ्रमण मोहिमेचे नेतृत्व केले. तेव्हा टिपूर चांदण्यात धोडपची भिंत खुणावत होती. त्यानंतर किल्ल्यावर दोन वेगवेगळ्या मोहिमांमध्ये पश्‍चिम बाजूने चढाईचा अभ्यास करण्यात आला होता. प्रत्यक्ष आरोहणात फारसे अडथळे आले नाहीत. परंतु, सरळसोट चढाई असल्याने पायाचा चवढा मावेल इतक्‍या चिऱ्यांवर आधार घेत चढाई केली. विशेष म्हणजे संपूर्ण चढाईत केवळ दोन ठिकाणी प्रसरणात्मक खिळ्यांचा (बोल्ट) वापर करून किल्ल्याच्या दगडाची हानी होणार नाही, याची काळजी घेण्यात आली. या आरोहण मोहिमेची माहिती आता महाराष्ट्र सेवा संघ संचालित "गिरीमित्र संमेलन' समितीकडे देण्यात येईल. त्यानंतर धोडप सुळका पश्‍चिम बाजूने सर झाल्याच्या विक्रमास अधिकृत मान्यता मिळेल.
---
नऊ तोफांचे शल्य
धोडप सुळक्‍याच्या पश्‍चिम बाजूला प्रचंड वारे व पावसामुळे झीज झाल्याने काही अजस्त्र बोल्डर्स कोणत्याही क्षणी सुटण्याच्या बेतात आहेत. किल्ल्याच्या पाच तटबंद माच्यांची अवस्था बिकट असून, सर्वच माच्यांचे दगड सुटू लागले आहेत. गडावर काही वर्षांपूर्वी सेनादलाच्या अधिकाऱ्यांनी नऊच्या नऊ तोफा बेदरकारपणे वरून ढकलून देवळाली कॅम्प येथे नेल्याने गडाच्या सौंदर्यात गालबोट लागल्याचे शल्य हट्टीच्या गावकऱ्यांनी "सकाळ'जवळ व्यक्त केले.

Friday, December 5, 2008

दृष्टचक्रातून बाहेर येण्यासाठी



शरीर नव्हे, मनं चिंब भिजवून टाकणाऱ्या या जलप्रपाताची आज खरी आठवण होत आहे!
मुंबईवर दहशतवादी हल्ले झाले, त्याच्या जखमा, इमारती, हॉटेल,
इस्पितळ, रेल्वे स्थानकांपेक्षा मनावर अधिक आहेत.
मृत्यूचं ते एक तांडव होतं!

आणि माहितीच्या विस्फोटामुळे दुरचित्रवाणी, नभोवाणी, इ.)
हे तांडव सद्या दरोजच (इच्छा नसतानाही) पाहावे लागत आहे.
दूरचित्रवाणीवरच्या बातम्यांचा मारा हा अनावश्‍यक व अती होत आहे.
नुसत्या बातम्याच नव्हे, या बातम्या नाटकी पणे सादर केल्या जातात,
बातम्यांच्या सोबत दिला जाणारा आवाज (व्हॉईस ओव्हर) स्वाभाविक
नसुन त्याच्यात मुद्दाम नाटकीयता ओतली जाते; इतकेच नव्हे बातम्यां
सोबत दिले जाणारे संगीत कर्कश: व मन:विचलीत करणारे आहे.

या दृष्टचक्रातून बाहेर येण्यासाठी मी शरीर थकविणाऱ्या, पण
मनाला कमालीचा तजेला आणणाऱ्या दुर्ग धोडप भ्रमंतीवर शनिवारी जात आहे.
...चला तर मग भेटूया किल्ले धोडपची सैर करून आल्यानंतर.
(काही चांगले स्नॅप्स जरूर शेअर करू)

Friday, November 28, 2008

Who’s fault is this!



- Blood stained CST railway station of Mumbai : the horrific site after Pak or Pok sponspred terrorist opened indiscriminate fire on 27 November.

Sea of Lensmen near the Taj Heritage hotel



- Sea of Lensmen near the Taj Heritage hotel await to catch the critical movements of terrorist seizer of foreign tourist.

Saturday, September 13, 2008

हळदीच्या ताटव्यात सोनेरी मंडुक


नाशिकमध्ये आढळले दुर्मिळ बेडूक

प्रशांत परदेशी

नाशिक, ता. 21 : बसगड-उतवड परिसरात "वैनतेय' गिर्यारोहण, गिरिभ्रमण संस्थेच्या कार्यकर्त्यांना नुकतेच पिवळ्या, सोनेरी रंगाच्या दुर्मिळ बेडकीचे दर्शन झाल्याने निसर्गप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.
नाशिक जिल्ह्यात जंगलांचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास झाला आहे. त्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर जैवविविधता नष्ट झाली. दुर्गम भागात काही ठिकाणी अजूनही दाट झाडी टिकून आहे. त्यापैकीच एक म्हणजे ठाणे जिल्ह्याच्या सीमेवरील बसगड व उतवडचा परिसर. रानवाटा तुडविण्याचा छंद असलेली मंडळी या गडांच्या वाटेला फारशी जात नाही, याचे प्रमुख कारण म्हणजे या गडांचा इतिहास उपलब्ध नाही. त्यावर मुक्कामाची सोय नाही, की पाण्याचे प्राचीन किंवा नैसर्गिक तलाव नाहीत.
जव्हार व घोटी-इगतपुरीकडील आदिवासीबांधव पायी ये-जा करण्यासाठी निरगुडपाडा, कळमुस्ते, जांभुळपाडा, शेरीचा पाडा, काचुर्ली या मार्गांचा वापर करत असले तरी उतवडकडे सहसा पायपीट होत नाही. त्यामुळे उतवडच्या बाजूला माणसांची ये-जा कमी असल्याने त्याठिकाणी अनेक जैवविविधता काही प्रमाणात टिकून आहे. "वैनतेय'च्या मोहिमेदरम्यान या गोष्टीची प्रचीती आली.
दोन किल्ल्यांची खिंड ओलांडून हळदीच्या ताटव्यातून जाताना बसगडच्या दरीत हळदीच्या पानावर सोनेरी-पिवळ्या रंगाच्या दुर्मिळ बेडकीचे दर्शन घडल्याने मोहिमेत सहभागींचा आनंद गगनात मावेनासा झाला. या बेडकीच्या पायांच्या रचनेवरून ती झाड व पानांवर अधिक राहत असावी. छायाचित्र टिपताना बेडकी निर्धास्तपणे बसून होती, नंतर धोक्‍याची चाहूल लागल्याने तिने आपले शरीर फुगवून दाखविले.
सुमारे दहा मिनिटे बेडकीचे दर्शन घेतल्यानंतर मोहिमेतील कार्यकर्त्यांनी तिला तिच्या नैसर्गिक ठिकाणी तसेच सोडून पुढचा रस्ता धरला.
यंदा श्रावणात आषाढधारा धरल्याने बसगड व उतवड परिसरात नद्या, नाले भरभरून वाहत आहेत. अनेक प्रकारच्या वनस्पतींनी हा परिसर फुलला असून, आदिवासी बांधवांनी पेरणी केलेली भात, नागली, वरईची पिके चांगली रुजल्याचे चित्र दिसत आहे.

Friday, September 12, 2008

...काही प्रश्‍न


"स्टार माझा'च्या चमुवर झालेल्या हल्ल्याचा तिव्रपणे निषेध करण्यापूर्वी काही प्रश्‍न माझ्या मनात सारखा घोळत आहे:
1. पत्रकारीता या पेशाला समाजात मान-सन्मान आहे, तसा त्यांचा वचकही आहे.
जबाबदार व्यक्ती( अधिकारी, नेते, उद्योजक, कलावंत) तर मिडीयाचा सन्मान करायला चुकत नाहीत; व्यक्तीश: ते कितीही चुकत असले तरीही!
मोठ्या ब्रॅन्डचा मिडीया असेल तर काही त्रासच नाही, सर्व काही आलबेल.
अगदी व्हीआयपी ट्रिटमेंट.
लाल पायघड्या पांघरून स्वागतच!

- हा समज नाशिकमध्ये सचिन अहिरराव व आता नितीन भालेराव यांच्यावरील हल्ल्याने खोटा ठरवला आहे.
- माझ्या मते हा समज खोटा होताच, परंतू अनेकांच्या मनात पत्रकारितेचे जे चित्र उभे आहे, ती धारणा फसवी असल्याची ही दोन ठळक उदाहरणे.
2. पत्रकारांवर किंवा पत्रकारीतेवर हल्ला होण्याची काय ही पहिलीच वेळ आहे?
- नाही! तळमळीने ही सेवा करणाऱ्यांवर यापूर्वीही हल्ले झाले आहेत. भविष्यातही होत राहणार! यात शंका नाही?
स्तुती केलेले, कौतुक केलेले कुणाला आवडणार नाही? एखादा शब्द विरोधात गेला तर मात्र "मिडीया खराब'"अमुक प्रतिनिधी' पैसेखाऊ! असे सर्रास आरोप होतात.
3. बजाज फायनान्स प्रकरणात मिडीयाने फक्त घटनेची दखल घेतली होती. त्या घटनेचे वृत्त येण्याच्या आतच असा तुफान हल्ला झाला.
- यावरून एक गोष्टी स्पष्ट होते, ती म्हणजे वसुली करणाऱ्या कंपनीला आपण केलेल्या किंवा आपल्या हातुन घडलेल्या गुन्ह्याचे गांभीर्य कळून चुकले होते. त्यात व्यवसायत: दांडगटपणा, त्यामुळे मिडीयाकडून वस्तुनिष्ठ वृत्त येणार, विरोधातली बातमी येणार, की दोन्ही बाजुंना आपले म्हणणे मांडण्याची संधी देणार, याची वाट पाहण्याच्या आगोदरच मिडीयावर व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला झाला.
4. पोलिसांना क्रॉस कम्पलेनमध्ये किती इंटरेस्ट असतो, हे सर्वश्रृत आहे, परंतू बजाज फायनान्स कर्मचाऱ्यांची आगळीक ढळढळीतपणे स्पष्ट दिसत असतानाही, त्यांनी पत्रकारावर दंगलीचा गुन्हा दाखल करावा?
- व्यक्तीश: मला यात आश्‍चर्य वाटले नाही. या सारखे पोलिसांचे व गुंडाचे प्रताप मी व्यक्तीश: बघितले आहेत, आणि अनुभवले सुद्धा आहेत.
5. भालेरावांनी "इन्सिपिरेशन'चा जो मुद्दा उपस्थित केला, त्याने सर्वांनाच विचारात टाकायला हवे.
- पत्रकारांच्या रूपातील द्वारपालाचे मनोधैर्य असल्या गुंडगिरीने खचणार नाही, हे नक्की, पण मेनस्ट्रिमच्या बाहेरही मोठा मिडीया आहे. त्यांची "हाईरारकी', त्यांचे नियम, घटनांचे व आपल्या सहकाऱ्यांचे आकलन ते कोणत्या पद्धतीने करतात? याचा कोणताही ठावठिकाणा नसतो, अशी पत्रकारीतेतील, तिकेच महत्वाचे कार्य बजावणारी सेकंड, थर्ड, फोर्थ बॅच मेनस्ट्रिम मिडीयाच्या प्रतिनिधींवरील हल्ल्यामुळे व त्यांच्यावरील गुन्ह्यांमुळे बैचेन झाली नाही तरच नवल.
6. हे कायद्याचे, न्यायाचे राज्य आहे, असे सारेच म्हणतात.
- परंतू न्याय मिळत नसेल तर तो मिळवावा लागतो. पत्रकारांची छोटीशी दुनिया मुळातच प्रचंड विखुरलेली. मने सहजासहजी जवळ येत नाहीत. रकाने खरडताना, सण-वार, मित्र-परिवार, घर-दार सगळ्यांवर अन्याय होतो, आणि स्वत:वर बितली तर मग विचारूच नका.
त्यामुळेच "मिडीया ऑफ नासिक युनाईट' ही हाक द्यावीशी वाटते.
- फक्त नाशिकच का? तर आपले प्रश्‍न आपण घेऊन पुढे जाऊ शकतो. समाजाचे प्रश्‍न तर आपण मांडत असतोच. त्यातही प्रामाणिकपणे, तळमळीने काम करणारे स्वत:वर अन्याय झाला, तरी क्षमाशील मनाने थोड्याच कालावधीत झाले, गेले विसरायला लागतात... आणि मधुनच एखादी सचिन अहिरराव, नितीन भालेराव, अरूण दीक्षित घटना घडते.
-त्याकरिता नाशिकच्या मिडीयाने सोशल, सेल्फ इश्‍युज घेऊन महिन्यातून किमान एकदा एकत्र यायला काय हरकत आहे.
- प्रशांत परदेशी, नाशिक.

Wednesday, May 28, 2008

त्र्यंबकच्या डोंगररांगांवरून काळ्याकुट्ट मेघांचा प्रवास

पेगलवाडी : मेघांचे थवेच्या थवे त्र्यंबकेश्‍वरच्या डोंगररांगांना स्पर्श करून जात आहेत. ब्रह्मगिरी पर्वतावरील संडे पिनॅकल, पंचलिंग, दुर्गभांडारचा परिसर सध्या ढगांनी असा व्यापत आहे. (छायाचित्र ः प्रशांत परदेशी)
यंदा लवकर आगमन : हवेत थंडावा, वळवाच्या पावसाची वार्ता

प्रशांत परदेशी ः सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. 20 : त्र्यंबकेश्‍वरच्या डोंगररांगांवर रविवारपासून (ता. 18) काळ्याकुट्ट मेघांनी गर्दी केली असून, वेगवान वाऱ्यासह इथल्या डोंगररांगांना स्पर्श करून जाणारे मेघ "वळवाचा पाऊस लवकरच पडणार' अशी जणू वार्ताच देत आहेत. साधारणतः मेच्या मध्यास थरचे वाळवंट कमालीचे तप्त होते, तशी तेथील हवेची पोकळी भरून काढण्यासाठी अरबी समुद्रावरील पाण्याने भरलेल्या ढगांची उत्तर भारताच्या दिशेने आगेकूच सुरू होते.
ढगांचे असे थवेच्या थवे उत्तरेकडे प्रवास सुरू करतील, हिमालयाचे छाताड त्यांना अडवून धरेल, तसे पावसाचे ढग गोळा होऊन भारतीय उपखंडात "वर्षा'चे आगमन होईल.
रविवारी त्र्यंबकेश्‍वर व परिसरातील डोंगररांगांवर जोरदार वारे वाहत होते. दिवसभर या वाऱ्यांबरोबर मेघांचा नेत्रदीपक प्रवास जमिनीवरून न्याहाळता येत होता. वैशाखाच्या मध्याला त्र्यंबक भागातील ढगांचे आगमन म्हणजे मॉन्सून चक्राचाच एक भाग होय. ढगांचे आगमन हवेतील उष्मा नाहीसा करते. उष्णतेची छोटीशी लाट येते व त्यानंतर लगेचच वळवाचा पाऊस होतो, हे इथले नित्याचे चक्र. पावसाचे आगमन आता दूर नाही, याची चाहूल ते देते. शहरी भागातही वेगवान वारे वाहत होते. त्यामुळे उन्हापासून संरक्षणासाठी लावलेली आच्छादने हेलकावत होती, तर गृहिणींना उन्हात ठेवलेले वाळवण उडून जाऊ नये, याची खबरदारी घ्यावी लागत होती.
-----------
लाकूडफाट्याची लगबग
पाऊस महिना-पंधरा दिवसांत कोसळणार, याची चाहूल लागल्याने ग्रामीण आदिवासी भागात लाकूडफाटा गोळा करण्याची लगबग दिसून आली. त्र्यंबकच्या डोंगररांगावर फेरफटका मारला, तेव्हा अनेक खेडूत सहकुटुंब कुऱ्हाड, कोयते घेऊन गवत, लाकूड, कारवी कापून त्यांचे भारे तयार करण्यासाठी, वाळलेल्या गोवऱ्या गोळा करण्यासाठी डोंगरांकडे निघाल्याचे चित्र दिसत होते.
-----------
वळवाचा पाऊस आधी
या वर्षी ढगांचा मनोहारी प्रवास पौर्णिमेच्या काही दिवस अगोदरपासून सुरू झाला आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्‍वर परिसरात पौर्णिमेनंतर हमखास कोसळणारा वळवाचा पाऊसही दोन-एक दिवस अगोदरच कोसळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे, असे येथील धार्मिक अभ्यासक राजेश दीक्षित यांनी सांगितले.