Friday, December 12, 2008
सर्वात अवघड बाजुने धोडप सुळका सर
Dike formation at Dhodap Fort, white spots at the far extreme are of Saptashrungi, Vani.
नाशिकचे गिर्यारोहक : सातमाळ रांगेतील सर्वांत उंच व अवघड मोहीम फत्ते प्रशांत परदेशी ः सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. 10 : आपले राकट, पिळदार, पुरुषी सौंदर्य ल्यालेल्या सातमाळ रांगेतील सर्वांत उंच अशा धोडप गडावरील पाचशे फूट उंचीचा सुळका नाशिकच्या दोन गिर्यारोहकांनी सर्वांत अवघड अशा पश्चिम बाजूने प्रथमच सर करण्याचा पराक्रम केला. "वैनतेय' संस्थेचे समीरण कोल्हे व सोमदत्त म्हस्कर यांच्या या अलौकिक पराक्रमामुळे महाराष्ट्राच्या गिर्यारोहण इतिहासात आणखी एक मानाचे पान लिहिले गेले आहे.
धोडंबे (ता. चांदवड) गावाजवळ व्हेल्कॅनिक प्लगची रचना असलेला सुळका व त्यापासून निघालेल्या निरुंद सोंडेच्या डाईक पद्धतीच्या अनोख्या रचनेमुळे आपले वेगळेपण जोपासणारा चार हजार 761 फूट उंचीचा धोडप किल्ला. एका निरुंद माचीवर "एखादा डोंगरच आणून ठेवला असावा' अशा आविर्भावात उभा असलेला निसर्गनिर्मित वास्तुशिल्पाचा हा अप्रतिम आविष्कार मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून येता-जाता सहजगत्या दृष्टीस पडतो. या गडावर असलेल्या 500 फूट उंचीच्या सुळक्यावर परंपरागतरीत्या पूर्वेकडून चढाई होते. महाराष्ट्राच्या गिर्यारोहणाचा प्रमुख ग्रंथ म्हणून मान्यता असलेल्या "सांगाती सह्याद्रीचा' या हृषीकेश यादव यांनी संपादित केलेल्या ग्रंथात धोडप सुळक्यावर पूर्व दिशेने चढाईचा मार्ग दर्शविण्यात आला आहे. या बाजूने हा सुळका सोप्या श्रेणीत गळला जातो.
"वैनतेय'च्या गिर्यारोहकांनी सर्वांत अवघड अशा पश्चिम बाजूने शनिवारी (ता. 6) साडेचार तासांत चढाई करून एक नवा मार्ग खुला केला. समीरण कोल्हे या धाडसी गिर्यारोहकाने छत्रपती शिवाजी महाराज व सप्तशृंगी देवीचे नामस्मरण करून सकाळी आठला चढाईस सुरवात केली. दुपारी चार वाजून तीस मिनिटांनी समीरण सर्वांत प्रथम शिखरावर पोचला व त्याबरोबरच उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत उंच व नव्या मार्गावरची मोहीम फत्ते झाली. पाठोपाठ सोमदत्त म्हस्कर हा झुमारिंग करीत वर दाखल झाला आणि "वैनतेय'च्या दोन गिर्यारोहकांनी अत्यंत अवघड अशा बाजूने धोडप सुळका सर केला.
पंधराच दिवसांपूर्वी रायगडावरील लिंगाणा सुळका 24 तासांच्या चढाईत सर केल्याने धोडप सुळक्यावरचा नवा मार्ग उघडण्यात यश येणार, असा आत्मविश्वास होता. सुदैवाने हवामान चांगले असल्याने धोडपची मोहीम फत्ते झाल्याची प्रतिक्रिया सोमदत्त याने "सकाळ'शी बोलताना दिली.
आजमितीला नाशिकचा सर्वांत गुणी गिर्यारोहक म्हणून मान्यता असलेल्या समीरणने सांगितले, की तीन वर्षांपूर्वी "वैनतेय'च्या एका रात्री पदभ्रमण मोहिमेचे नेतृत्व केले. तेव्हा टिपूर चांदण्यात धोडपची भिंत खुणावत होती. त्यानंतर किल्ल्यावर दोन वेगवेगळ्या मोहिमांमध्ये पश्चिम बाजूने चढाईचा अभ्यास करण्यात आला होता. प्रत्यक्ष आरोहणात फारसे अडथळे आले नाहीत. परंतु, सरळसोट चढाई असल्याने पायाचा चवढा मावेल इतक्या चिऱ्यांवर आधार घेत चढाई केली. विशेष म्हणजे संपूर्ण चढाईत केवळ दोन ठिकाणी प्रसरणात्मक खिळ्यांचा (बोल्ट) वापर करून किल्ल्याच्या दगडाची हानी होणार नाही, याची काळजी घेण्यात आली. या आरोहण मोहिमेची माहिती आता महाराष्ट्र सेवा संघ संचालित "गिरीमित्र संमेलन' समितीकडे देण्यात येईल. त्यानंतर धोडप सुळका पश्चिम बाजूने सर झाल्याच्या विक्रमास अधिकृत मान्यता मिळेल.
---
नऊ तोफांचे शल्य
धोडप सुळक्याच्या पश्चिम बाजूला प्रचंड वारे व पावसामुळे झीज झाल्याने काही अजस्त्र बोल्डर्स कोणत्याही क्षणी सुटण्याच्या बेतात आहेत. किल्ल्याच्या पाच तटबंद माच्यांची अवस्था बिकट असून, सर्वच माच्यांचे दगड सुटू लागले आहेत. गडावर काही वर्षांपूर्वी सेनादलाच्या अधिकाऱ्यांनी नऊच्या नऊ तोफा बेदरकारपणे वरून ढकलून देवळाली कॅम्प येथे नेल्याने गडाच्या सौंदर्यात गालबोट लागल्याचे शल्य हट्टीच्या गावकऱ्यांनी "सकाळ'जवळ व्यक्त केले.
Friday, December 5, 2008
दृष्टचक्रातून बाहेर येण्यासाठी
शरीर नव्हे, मनं चिंब भिजवून टाकणाऱ्या या जलप्रपाताची आज खरी आठवण होत आहे!
मुंबईवर दहशतवादी हल्ले झाले, त्याच्या जखमा, इमारती, हॉटेल,
इस्पितळ, रेल्वे स्थानकांपेक्षा मनावर अधिक आहेत.
मृत्यूचं ते एक तांडव होतं!
आणि माहितीच्या विस्फोटामुळे दुरचित्रवाणी, नभोवाणी, इ.)
हे तांडव सद्या दरोजच (इच्छा नसतानाही) पाहावे लागत आहे.
दूरचित्रवाणीवरच्या बातम्यांचा मारा हा अनावश्यक व अती होत आहे.
नुसत्या बातम्याच नव्हे, या बातम्या नाटकी पणे सादर केल्या जातात,
बातम्यांच्या सोबत दिला जाणारा आवाज (व्हॉईस ओव्हर) स्वाभाविक
नसुन त्याच्यात मुद्दाम नाटकीयता ओतली जाते; इतकेच नव्हे बातम्यां
सोबत दिले जाणारे संगीत कर्कश: व मन:विचलीत करणारे आहे.
या दृष्टचक्रातून बाहेर येण्यासाठी मी शरीर थकविणाऱ्या, पण
मनाला कमालीचा तजेला आणणाऱ्या दुर्ग धोडप भ्रमंतीवर शनिवारी जात आहे.
...चला तर मग भेटूया किल्ले धोडपची सैर करून आल्यानंतर.
(काही चांगले स्नॅप्स जरूर शेअर करू)
Subscribe to:
Posts (Atom)