Wednesday, May 28, 2008

त्र्यंबकच्या डोंगररांगांवरून काळ्याकुट्ट मेघांचा प्रवास

पेगलवाडी : मेघांचे थवेच्या थवे त्र्यंबकेश्‍वरच्या डोंगररांगांना स्पर्श करून जात आहेत. ब्रह्मगिरी पर्वतावरील संडे पिनॅकल, पंचलिंग, दुर्गभांडारचा परिसर सध्या ढगांनी असा व्यापत आहे. (छायाचित्र ः प्रशांत परदेशी)
यंदा लवकर आगमन : हवेत थंडावा, वळवाच्या पावसाची वार्ता

प्रशांत परदेशी ः सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. 20 : त्र्यंबकेश्‍वरच्या डोंगररांगांवर रविवारपासून (ता. 18) काळ्याकुट्ट मेघांनी गर्दी केली असून, वेगवान वाऱ्यासह इथल्या डोंगररांगांना स्पर्श करून जाणारे मेघ "वळवाचा पाऊस लवकरच पडणार' अशी जणू वार्ताच देत आहेत. साधारणतः मेच्या मध्यास थरचे वाळवंट कमालीचे तप्त होते, तशी तेथील हवेची पोकळी भरून काढण्यासाठी अरबी समुद्रावरील पाण्याने भरलेल्या ढगांची उत्तर भारताच्या दिशेने आगेकूच सुरू होते.
ढगांचे असे थवेच्या थवे उत्तरेकडे प्रवास सुरू करतील, हिमालयाचे छाताड त्यांना अडवून धरेल, तसे पावसाचे ढग गोळा होऊन भारतीय उपखंडात "वर्षा'चे आगमन होईल.
रविवारी त्र्यंबकेश्‍वर व परिसरातील डोंगररांगांवर जोरदार वारे वाहत होते. दिवसभर या वाऱ्यांबरोबर मेघांचा नेत्रदीपक प्रवास जमिनीवरून न्याहाळता येत होता. वैशाखाच्या मध्याला त्र्यंबक भागातील ढगांचे आगमन म्हणजे मॉन्सून चक्राचाच एक भाग होय. ढगांचे आगमन हवेतील उष्मा नाहीसा करते. उष्णतेची छोटीशी लाट येते व त्यानंतर लगेचच वळवाचा पाऊस होतो, हे इथले नित्याचे चक्र. पावसाचे आगमन आता दूर नाही, याची चाहूल ते देते. शहरी भागातही वेगवान वारे वाहत होते. त्यामुळे उन्हापासून संरक्षणासाठी लावलेली आच्छादने हेलकावत होती, तर गृहिणींना उन्हात ठेवलेले वाळवण उडून जाऊ नये, याची खबरदारी घ्यावी लागत होती.
-----------
लाकूडफाट्याची लगबग
पाऊस महिना-पंधरा दिवसांत कोसळणार, याची चाहूल लागल्याने ग्रामीण आदिवासी भागात लाकूडफाटा गोळा करण्याची लगबग दिसून आली. त्र्यंबकच्या डोंगररांगावर फेरफटका मारला, तेव्हा अनेक खेडूत सहकुटुंब कुऱ्हाड, कोयते घेऊन गवत, लाकूड, कारवी कापून त्यांचे भारे तयार करण्यासाठी, वाळलेल्या गोवऱ्या गोळा करण्यासाठी डोंगरांकडे निघाल्याचे चित्र दिसत होते.
-----------
वळवाचा पाऊस आधी
या वर्षी ढगांचा मनोहारी प्रवास पौर्णिमेच्या काही दिवस अगोदरपासून सुरू झाला आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्‍वर परिसरात पौर्णिमेनंतर हमखास कोसळणारा वळवाचा पाऊसही दोन-एक दिवस अगोदरच कोसळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे, असे येथील धार्मिक अभ्यासक राजेश दीक्षित यांनी सांगितले.